अराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…

अराकनी, एक ग्रीक मिथक

ग्रीसमध्ये एक कापड व्यापारी होता. त्याची मुलगी अराकनी. ती गालिचे आणि सुंदर नक्षीदार कापड विणायची. तिच्या हातात जादू होती असं लोक म्हणत. तिचे हात धागे विणताना सफाईदारपणे तरंगत, इतके की पाहणाऱ्याला वाटेल धागा तिच्या हातातून निर्माण होतोय. लोक तिची प्रशंसा करत आणि तीदेखील ती प्रशंसा मनापासून स्वीकार करायची.

अथीना ही विद्येची, कलेची आणि ज्ञानाची देवता. तिला अराकनी मानवी गर्वाचं प्रतीक वाटली. तिने अराकनीला लोकांसमोर तिच्यातून उत्तम गालिचा विणून दाखवण्याचं आव्हान केलं. दोघींची स्पर्धा लागली. अथीनानं ढगांचे तुकडे घेऊन त्यातून धागे निर्माण करत गालिचा गुंफला. गालीचावर सर्व ग्रीक देवतांच्या शौर्याची आणि महत्तेची चित्रं गुंफली होती.

अराकनी तितक्याच तरबेजपणे तिचा गालिचा विणत होती. तिचा गालिचा उत्कट रंग आणि उत्तम नक्षीनं तयार होत होता. मात्र तिच्या गलीचावर तिनं ग्रीक देवतांची विकृती आणि विक्षिप्तपणाची चित्रणं केली होती. अराकनीची कला पाहून सगळे चकित झाले. तिने अथीनाचा पराभव केला होता.

देवतांचा असा अपमान केल्याबद्दल अथीना रागावली आणि तिने अराकनीला शाप दिला. तिच्या पाठीतून पाय बाहेर निघाले आणि तिच्या हाता पायांवर काळे कुरूप केस उगवले आणि जगातल्या पहिल्या कोळ्याच्या जन्म झाला. अराकनी आणि तिची मुलं आजही देवांच्या निषेधात आपला विणकामातला तरबेजपणा दाखवत राहतात…देव मात्र आज नावाला उरले नाहीत…कोळीवर्गीय किटकांना इंग्रजीत त्यामुळंच अराकनिड्स म्हणतात…

साभार- प्रथमेश पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *